Koregaon Bhima : कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 206 वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भल्यापहाटे कोरेगाव भीमा येथे येऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ भारताच्या इतिहासातील शौर्याचं प्रतिक आहे.
दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी १ जानेवारीला येथे अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात. यंदाही लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. यंदाच्या अभिवादन सोहळ्यासाठी विजयस्तंभाला साडेचार टन वजनाच्या विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
शौर्यदिनानिमित्त राज्यभरातून अनेक भीमसैनिक रविवारी रात्रीच कोरेगाव-भीमा परिसरात दाखल झाले आहेत. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त देखील ठेवला आहे. पोलिसांसह आरोग्य सेवा, वाहतुक, पार्किंग, शौचायल अशा सर्व सुखसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मदतीसाठी ३२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ७०० होम गार्ड्स आणि SRPF च्या ६ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
विजय स्तंभाला अभिवादन करणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत दर्शन घ्यावे : अजित पवार
कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत दर्शन घ्यावे. शांततेत शौर्यस्तंभास अभिवादन करावे. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.