पुणे : राज्यात आजपासून तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा आज शुभारंभ होणार आहे. सायंकाळी 4.15 वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने तर रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा प्रत्यक्ष उपस्थित राहून कोल्हापूर स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
कोल्हापूर स्थानकावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिंकदराबाद आणि कोल्हापूर ते पुणे या मार्गावर या नव्या वंदे भारत धावणार आहेत. कोल्हापूर-पुणे मार्गावर आठवड्यातून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
16 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर, नवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहे. आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर ते पुणे आणि अन्य तीन दिवस पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस, दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणार आहे. तर प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पुण्याहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस, सायंकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापुरात येणार आहे.
आज पासून सुरू होणारी पुणे कोल्हापूर ही पुण्याला मिळालेली पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. यापूर्वी पुण्यावरुन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. त्यानंतर आज पासून धावणारी मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. तर पुणे ते हुबळ ही स्वतंत्र गाडी देखील आजपासून धावणार आहे.