पुणे : गणेश जयंतीनिमित्ताने फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड व इतर रोडवर वाहतूक वाढून या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार व तेथील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार मंगळवारी (ता.१३) सकाळी ७ वाजल्यापासून गर्दीसंपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
असा असेल वाहतुकीतील बदल
पुरम चौकातून बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जावे.
शिवाजी रोडवरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक-टिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जावे.
स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जावे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करुन ती बाजीराव रोडने सरळ सोडण्यात येईल.