पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील एकूण १२ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या शाळांना महापालिका शिक्षण विभागाने नोटिसा बजावत पालकांनाही या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. या अनधिकृत शाळा संबंधित शाळा व्यवस्थापनाला परवानगीविना सुरू करता येणार नाहीत. याची खबरदारी प्रशासन घेणार आहे, असे महापालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत २०२४.२०२५ या शैक्षणिक वर्षात काही खासगी तसेच प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतरित्या चालविण्यात येत आहेत. यामध्ये पिंपळे निलखमधील गांधीनगर येथील पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, विशालनगर येथील चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळेगुरवमधील जवळकरनगर येथील आयडीएल इंग्लिश स्कूल, चऱ्होली येथील स्टारडम इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर येथील लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, वाल्हेकरवाडी लक्ष्मीनगर येथील नवजित विद्यालय, पिंपळे सौदागर येथील किड्सजी स्कूल, सांगवी येथील एम.एस. स्कूल फॉर किड्स, चिंचवड येथील क्रिस्टल मॉर्डन स्कूल तसेच ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी येथील माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल आणि डी.एम. के. इंग्लिश स्कूल या शाळांचा या समावेश आहे.
अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. घेतल्यास नुकसानीस पालक स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा प्राथमिक शिक्षण विभागाने दिला होता. तसेच, संबंधित शाळांना नोटिसा देत अनाधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. परंतु, सद्यस्थितीत या शाळांबाबत पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रत्यक्षात जून महिन्यात या शाळा सुरू होणार नाहीत, याची खबरदारी प्रशासन घेणार असल्यांचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळांच्या संस्थाचालकांनी शासन परवानगी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. संबंधित शाळा व्यवस्थापनांना नोटिसा दिल्या असून, पालकांना आवाहन केले होते. तरीही सद्यःस्थितीत शाळा सुरू नसल्याने कोणती कारवाई केलेली नाही. परंतु, कोणत्याही विद्याथ्यांचे नुकसान होणार नाही. यासाठी प्रत्यक्षात जूनमध्ये या अनधिकृत शाळा सुरू होणार नाहीत. याची खबरदारी घेतली जाणार आहे.
संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग