उरुळी कांचन : खामगाव टेक (ता. हवेली ) येथील एका शेतमजूराच्या मुलीला फूस लावून दुचाकीवर बसवून अपहरण करणाऱ्या आरोपीला उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
अशोक छगन राजपूत (वय-४० ,रा. तांबीगोटा वस्ती, मांजरी , छत्रपती संभाजीनगर) असे अपहरण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्या राहत्या घरातून मुलीसह ताब्यात घेतले असून मुलीची सुखरूप सुटका केली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक राजपूत हा काही दिवसांपूर्वी खामगाव टेक परिसरात उस तोडण्यासाठी आला होता. यावेळी त्याने या मुलीच्या घरच्यांशी ओळख करून घेतली होती. मुलीच्या अपहरण करण्याचा दृष्टीने तात्पुरती मुलीच्या कुटूंबियाशी सलगी करीत तिचे अपहरण केले.
मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना या अपहरणकर्त्याची ओळख नसल्याने हे अपहरण कोणी केले म्हणून मुलीच्या वडीलांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली होती. सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना परिसरातील तसेच पुणे – सोलापूर महामार्ग, पुणे – नगर महामार्गावरील सीसीटीव्ही शोधले, तसेच विविध ६ पथके तपासासाठी नेमण्यात आली होती. आरोपीबद्दल मिळत नसलेली माहिती व अपहरण झालेल्या दुचाकीचा क्रमांकात असलेली अस्पष्टतामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान, सीसीटीव्ही व विविध कौशल्य वापरून मागील पाच दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीचा पोलीस तापस करीत होते. यावेळी आरोपी राजपूत हा छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद केले. आरोपीने मुलीचे का अपहरण केले याची माहिती अद्याप मिळाली नसून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत.
सदरची कामगिरी दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, प्रभारी निरीक्षण नारायण देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी केला आहे.
मुलीच्या वडिलांनी फोडला टाहो..
मुलीचे अपहरण होऊन पाच दिवस होऊनही पोलिस तपासात आरोपीचा मार्ग सापडत नसल्याने प्रचंड चितेंत व मानसिक आवस्थेत कुटुंबीय होते. मात्र उरुळी कांचन पोलिसांनी मुलीच्या कुटूंबियाला दिलेले धैर्य यामुळे हे कुंटूंब मुलगी मिळेलच या आशेवर वाट पाहत होते. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची खाकितील माणुसकी व तपास कार्यातील प्रबळ इच्छाशक्ती आरोपीला गजाआड करुन गेल्याची भावना मुलीच्या वडीलांनी बोलून दाखविली. मुलगी दिसताच वडीलांनी व तिच्या घरच्यांनी टाहो फोडला व पोलिसांचे आभार मानले.