लोणी काळभोर, ता. २२ : महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ व पुणे जिल्हा सलग्न खेड तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत खेड अध्यक्षपदी नितीन गोपीचंद सैद, कार्याध्यक्षपदी लहू शंकर लांडे, उपाध्यक्षपदी मनोहर किसन गोरगल्ले, सचिव पदी आशिष अण्णासाहेब ढगे व कायदेशीर सल्लागार पदी ॲड. प्रीतम रामदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दै.पुणे प्राईम न्यूज च्या कार्यालयात बुधवारी (ता.२२) बैठक पार पडली. या बैठकीत वरील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष तथा दै. पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, दै. पुणे प्राईम न्यूज चे उपसंपादक हनुमंत चिकणे, विशाल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर म्हणाले की, आजपासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे. या पदाच्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, या संघटनेच्या ध्येयधोरणांना अनुसरून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासाचे भरीव कार्य आपल्या हातून घडावे हीच सदिच्छा!
दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन सैद म्हणाले की, मला दिलेली जबाबदारी मी चोखपणे पार पडणार आहे. या पदाच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविणार आहे. तसेच तालुक्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.