खेड, (पुणे) : खेड तालुक्यातील नागरिकांचे तहसील कार्यालयाकडे महसुली प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गुरुवारी (ता. २१) महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालत पंचायत समिती खेड (सभागृह) येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली.
या महसूल अदालतीमध्ये एकूण प्रलंबित असलेले १५८ प्रकरणातील पक्षकारांना यापूर्वीच नोटीसा बजावून आवश्यक दस्तऐवज/पुरावे, लेखी जबाबासह सुनावणीस हजर राहण्यासाठी कळविण्यात आले आहे. प्रकरणातील सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेऊन दाखल पुराव्यांच्या आधारे त्याच दिवशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेले प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार आहेत. यावेळी तलाठी मंडळ अधिकारी देखील हजर राहणार आहेत.
प्रकरणातील आदेशाप्रमाणे तात्काळ ७/१२ सदरी फेरफार घेऊन नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना आदेशानंतर पुन्हा तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे नागरिकांची फार मोठी सोय होणार आहे. तसेच नागरिकांच्या वेळेत बचत होऊन, वारंवार सुनावणीस हजर राहण्याची आवश्यकता राहणार नाही. याचा नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, सदर महसूल अदालत पंचायत समिती सभागृहामध्ये होणार असून, तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सर्व पक्षकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले आहे. तरी प्रकरणातील सर्व पक्षकारांनी वेळेवर उपस्थित राहून अदालतीमध्ये सहभागी व्हावे, असे बेडसे पाटील यांनी सांगितले.
अशा प्रकरणाचा निपटारा हवेलीत होणार का?..!
प्रलंबित सातबारा दुरुस्तीच्या प्रकरणांत तसेच प्रलंबित फेरफारच्या प्रकरणांमध्ये असाच उपक्रम हवेलीत राबवण्याची गरज असून तलाठी व मंडलाधिकारी यांच्या उपस्थितीत आदेश निघाल्यास त्याची सातबारा सदरी ताबडतोब अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे तलाठी व सर्कलच्या “विलंबाच्या कोलदांड्याला ब्रेक” मिळेल असे नागरिकांनी “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना सांगितले.