गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्थानकाच्या (Kedgaon Railway Station) इमारतीला 50 वर्षे पूर्ण झाल्याने केक कापून या इमारतीचा वाढदिवस साजरा केला गेला आहे. अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने जुन्या प्रवासी वर्गाच्या 50 वर्षातील जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
ब्रिटीशकालीन सुरू झालेल्या पुणे ते दौंड रेल्वे मार्गावरील केडगाव हे जुने स्थानक असून, या ठिकाणाहून रेल्वेचा एकेरी मार्ग जात होती. 1973 मध्ये जुन्या रेल्वेस्थानक स्थलांतरित करण्यात आले होते. तत्कालीन आमदार उषा जगदाळे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. आज त्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेश मार्गावर रंगीबेरंगी फुग्यांची कमान व आकर्षक अशी फुलाची सजावट करण्यात आली होती.
या सोहळ्यासाठी रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले आणि ज्यांनी गेली 40 वर्षे याच स्थानकावर सेवा केली होती ते साहेबराव गेनबा शेलार, त्यांचे सहकारी सय्यद इब्राहिम यांच्यासह बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडणवर, केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक पी. एम. घोरमारे, सहाय्यक स्टेशन प्रबंधक राजू कुमार यांच्यासह आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र मलकेकर, केडगाव, बोरीपार्धी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.