गणेश सुळ
Kedgaon News : (पुणे) : खुटबाव (ता. दौंड) परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून मोठी दहशत निर्माण झाली आहे. या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.(Kedgaon News)
पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
शेतात काम करत असताना शेतमजुरांना तसेच ग्रामस्थांना अचानक बिबट्या दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला बिबट्या वावरताना गावातील निखिल थोरात यांना दिसला. गाडीच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. यापूर्वी खुटबाव परिसरामध्ये अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करत फस्त केले. काही दिवसांपूर्वी कदमवस्ती या ठिकाणी योगेश कदम यांच्या गोठ्यावर असलेल्या पाळीव प्राण्यांच्यावरदेखील बिबट्याने हल्ला केला होता. परंतु याची तेथील वस्ती मध्ये असलेल्या श्वानाला चाहूल लागताच सर्व शेतकरी वर्ग जागा झाला यामुळे मोठी हानी टळली.(Kedgaon News)
दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल केले गेले होते. यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी व पिंजरा बसवावा, अशी मागणी खुटबावच्या सरपंच गीता शितोळे, उपसरपंच सुधीर थोरात, निखिल थोरात, ग्रामविकास अधिकारी परशुराम राऊत, नानासाहेब डोमाळे यांनी केली आहे. (Kedgaon News) ग्रामपंचायतीने त्वरित कागदपत्रांची आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पूर्तता करावी. दोन दिवसात परिसरात तातडीने पिंजरा लावला जाईल, असे आश्वासन वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना दिले. नागरिकांनी सतर्क राहावे. रात्री अपरात्री शेतात न जाण्याचा सल्ला दिला.(Kedgaon News)
दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, “परिसराची तातडीने पाहणी करून पिंजरा लावण्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला तातडीने कळवले जाईल असे सांगितले.”(Kedgaon News)
खुटबाव येथील माजी उपसरपंच निखिल थोरात म्हणाले, “गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याने खुटबाव परीसरात मोठी दशहत निर्माण झाली आहे.शेतीसाठी रात्रीच्या वेळी पाणी देणेसाठी जावे लागते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी वर्गाकडून उपाययोजना केल्या जावेत. वनविभागाने लवकरात लवकर दखल घ्यावी.परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे.”