शिरूर : शिरूर तालुक्यातील बाभुळसर येथील कवी संतोष फंड यांच्या ‘ऋणानुबंध’ या काव्यसंग्रहाला पुणे काव्यमित्र संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रीय बहिणाई काव्यप्रतिभा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. साहित्य क्षेत्रात लक्षणीय योगदान दिल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बहिणाबाईंच्या कविता म्हणजे माती आणि माणसातील अतूट नातं उलगडून दाखवणारे जीवनकाव्य आहे. कवी संतोष फंड यांची कविता थेट बहिणाबाईंच्या कवितेशी नातं सांगणारी व हृदयाला हात घालणारी आहे, असे गौरवोद् गार पुरस्कार निवड समितीने काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जे. डी. अवघडे यांनी कवी फंड यांना शाल, श्रीफळ व गौरवपत्र देऊन सन्मानित केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी अशा प्रतिभावंत लोकांना समाजासमोर आणल्याबद्दल काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांचेही विशेष कौतुक केले. याप्रसंगी सूर्यकांत शेटकार यांच्या ‘आरसा समाजमनाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, पिंपरी-चिंचवडच्या तहसिलदार अर्चना निकम, प्रसिद्ध सेवाभावी उद्योजक सुशील बियाणी, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ रश्मीकुमार अब्रोल आणि करनिरीक्षक डॉ. प्रमिला तलवाडकर उपस्थित होते.
श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला एन.आय.बी.आर. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. वैभव फंड, ज्येष्ठ कवी प्रा. जयराम मुसळे व कवी अनंत जाधव हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी सगर यांनी केले.