प्रतिनिधी- गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : शिखर शिंगणापूर येथे सुरू असलेल्या वार्षिक यात्रेसाठी डोर्लेवाडी (ता. बारामती) येथून कावडींचे भव्य आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. “हर हर महादेव” च्या जयघोषात, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या उत्साही उपस्थितीत ही पवित्र कावड यात्रा सुरू झाली.
प्रस्थानापूर्वी डोर्लेवाडी गावात कावडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कावडीची ग्रामप्रदक्षिणा पार पडली. गावातील प्रत्येक वेशीवर, देवस्थानांसमोर आणि चौकात स्वागताचे कार्यक्रम ठेवण्यात आले. भक्तगणांनी कावडींवर पुष्पवृष्टी केली. ग्रामप्रदक्षिणेनंतर महाआरतीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर कावडी शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करत निघाली.
पारंपरिक प्रथा अजूनही टिकून
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे 200 ते 250 किलो वजनाची कावड भक्त डोक्यावर घेऊन पायी चालत नेतात. श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेच्या आधारावर ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड सुरू आहे.
डोर्लेवाडीहून निघालेल्या कावडी झारगडवाडी, मेखळी, राजुरी, कुरवली आणि आंदरुड या मार्गावरून रात्रीचा प्रवास करत सकाळी कोथळे गावात पोहोचतात. तेथे सर्व कावडींसाठी नाश्त्याची व्यवस्था केली जाते. कोथळे येथे थोडा विश्रांतीनंतर पुढील प्रवास सुरू होतो तो म्हणजे सर्वात अवघड टप्पा -मुंगी घाट.
मुंगी घाटातून जिद्दीचा मार्ग..
मुंगी घाट ही एक अत्यंत अवघड चढण आहे. येथे कावडी डोक्यावर न नेता दोरखंडाच्या साहाय्याने वर खेचल्या जातात. हा टप्पा भक्तांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारा असतो. “हर हर महादेव” च्या गजरात आणि एकमेकांना साथ देत भक्तगण कावडी घाटातून वर नेतात. घाट पार केल्यानंतर कावडी शिखर शिंगणापूर येथे पोहोचतात. गुरुवार, दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी कावडी पुष्कर तलावावर दाखल होतील. तेथून जल भरून, कावडी शिंगणापूरच्या महादेव मंदिराकडे रवाना होतात.
पुष्कर जलाने महादेवाला अर्पण..
शिखर शिंगणापूर मंदिरात पोहोचल्यावर कावडीतील कऱ्हे नदीचे पाणी महादेवाला धार स्वरूपात अर्पण केले जाते. या क्षणाला विशेष भक्तिभावाचे वातावरण असते. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो आणि कावडी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. या यात्रेत डोर्लेवाडी येथील निलाखे, नाळे, बनकर आदी कुटुंबांच्या कावडी सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक कावडीमागे एक परिवार, एक परंपरा, आणि एक अखंड श्रद्धेची ज्योत आहे. या यात्रेमुळे डोर्लेवाडी गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.