करमाळा: एकेकाळचे बागल गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते करमाळा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांना गुरुवारी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमात मकाईचे माजी चेअरमन तथा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्याकडून मारहाण झाल्याची घटना रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सदरच्या प्रकारानंतर करमाळा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला. तर बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वारे यांच्या राजकारणाची सुरुवात स्व.दिगंबररावजी बागल यांच्या माध्यमातून झाली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच वारे हे बागल गटाचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गणले जायचे. स्व. बागल यांच्यानंतर वारे यांनी तसेच नाते इतरांसह टिकून ठेवले होते व मागील काही काळापूर्वी त्यात दुरावा निर्माण झाला.
वारे यांनी वेगळा निर्णय घेत राष्ट्रवादी सोबत राहण्याचा निर्णय घेतला. काल गुरुवारी रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सर्व मित्रमंडळी शहराबाहेरील एका हॉटेलवर जमा झाली होती. रात्री आठच्या सुमारास वारे त्या ठिकाणी पत्नीसह पोहोचले. त्या ठिकाणी गेल्यानंतर बागल यांच्याकडुन वारे यांना एका वायरल व्हिडिओवरून विचारणा करण्यात आली. त्यानंतर हाताने मारहाण केल्याची घटना घडली.
दरम्यान वारे यांची तीन तोळ्याची चेन परिसरात पडल्याने त्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आलेला आहे. रात्री उशिरापर्यंत करमाळा पोलीस ठाण्यात वारे समर्थकांनी गर्दी केलेली होती. त्यानंतर पोलिसांनी दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.