लोणी काळभोर, (पुणे) : आई-वडील यांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे, प्रेरणा घेऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील निखील अंकुश लांडगे याने यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल कदमवाकवस्तीसह लोणी काळभोर परिसरातील व सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये निखील अंकुश लांडगे याने राज्य सेवा आयोगाच्या मुख्य राज्य गुणवत्ता यादीत १०२ क्रमांक मिळवला आहे.
निखिलचे पहिली ते बारावीचे शिक्षण हे साधना विद्यालय हडपसर या ठिकाणी झाले आहे. तर अभियांत्रिकी शिक्षण हे P.V.G. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व टेक्नोलॉजी, पुणे येथे झाले आहे. UPSC/ MPSC परीक्षेची ती तयारी करत होते. या मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे. या यशामध्ये आई, वडील, आजी आजोबा, नातेवाईक, मित्र परिवाराचा मोठा वाटा आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेवाळवाडी येथील उपबाजारातील मापाडी तोलणार अंकुश लांडगे यांचे ते चिरंजीव आहेत. याबाबत बोलताना अंकुश लांडगे म्हणाले, “पालकांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवावा, आपल्या मुलांना संधी द्या, पाठिंबा द्या. अशा भावना व्यक्त केल्या.
याबाबत बोलताना निखील लांडगे म्हणाले, “घरच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन अभ्यास केला पाहिजे, जिद्द व चिकाटीने मेहनत केल्यास नक्कीच यश मिळते. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) व केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी प्लानिंग “B’ सुद्ध तयार ठेवले पाहिजे.