दिवस सरतात, तसं वर्ष बदलतं… पण जाताना काही गोड तर काही कटू आठवणी कायमच स्मरणात ठेवून जातं… सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस आता जवळ आला आहे. नागरिक मोठ्या उत्साहानं स्वागताची तयारी करत आहेत. वृत्तपत्रांमध्ये नव्या वर्षाचे स्वागत नवनव्या विषयांवरील पुरवण्या काढून, सरत्या वर्षाचा आढावा घेऊन होते. या काळात पुरवण्यांना जाहिराती पुरवण्यासाठी पत्रकारांचाही आटापिटा सुरू असतो.
अशाच एका उत्साही पत्रकाराने वर्तमानपत्रात जाहिरात देण्यासाठी एका ठेकेदाराला फोन केला. त्यावेळी ‘अहो जाहिरात द्यायचीच हाय… पण थोडं थांबा. काय झालंय, मार्च एण्डला बिलं मिळत्यात, त्यावेळी जाहिरात दिली तर आम्हाला ठिक असतंय…’ असं सांगत त्याने टाळाटाळ सुरू केली. त्याचवेळी तेथून एका सोसायटीचे माजी अध्यक्ष जात होते. त्यांनी या ठेकेदाराचे बोलणे ऐकले. त्यांनी ठेकेदाराला विचारले की, ‘ठेकेदार साहेब, काय चाललंय? काय झालं एवढं चिडायला?’ त्यावेळी ठेकेदार म्हणाला की, ‘अहो या पत्रकारांनी सळो की पळो करून सोडलंय. कोणाला जाहिरात द्यायची, पेपरला की डिजीटलला? पत्रकारांचा लय सुळसुळाट झालाय… नाही म्हटलं की दांडकं घेऊन प्रतिक्रिया घेत्यात…’ त्यावेळी माजी अध्यक्ष महोदय म्हणाले की, ‘अहो तुम्हाला त्यांची गरज आहे. मग एखादी जाहिरात दिली तर कुठं बिघडलं. तुम्ही सरकारी कामं घेता, मग जाहिराती देऊन पत्रकारांना आपलंस करायलाच पाहिजे. जाहिरात नाही दिली की पत्रकारांचा लांझा मागं लागायचाचं. कुठं कामात सिमेंट कमी वापरलं, खडी बराबर नाही वापरली, काम नीट नाही केले की निकृष्ट दर्जाचे काम म्हणून तुमची बातमी यायचीच… त्यात नवल काय? त्यासाठी नावाजलेल्या पेपरला जाहिरात दिलीच पाहिजे. नाही तर काय खरं नाय? आमचं बरं हाय… जाहिरात द्यायला नको अन् सरकारी काम देखील घ्यायला नको…’
यावर ठेकेदार उत्तरला की, ‘अहो तुमचं खरं आहे. जाहिरात पण द्यायची अन् काम पण चांगलं झालं पाहिजे, हे बरोबर आहे काय? साहेबाला हिस्सा द्यावा लागतो, त्याचं काय? नुसते पत्रकार नाही सांभाळायचे तर साहेब पण सांभाळावा लागतो. नाहीतर मार्च एण्डला बिल निघत नाही. शिवाय पत्रकारांची नव वर्षाला जाहिरातीची बिले द्यावी लागतात. हे सगळं कामातूनच करावं लागतं. त्यावेळी माजी अध्यक्ष म्हणतात, ‘अहो, मग कामातून वचपा काढता ना तुम्ही, मग द्या की पत्रकारांना जाहिराती. हो… हो… ती तर द्यावीच लागेल’ असे म्हणत दोघेही हसतात. त्यातून तेरी भी चूप अन् मेरी भी चूप अशी परिस्थिती कानाकोपऱ्यात दिसत आहे.
अशी अनेक उदाहरणे समाजात आजही दिसत आहेत. त्यामुळे सरकारी कामे सुस्थितीत करणारे ठेकेदार आजही हातचे राखून काम करताना दिसतात. त्यातून कोणाकोणाला हिस्सा द्यायचा, हे ठरते. मग साहेब, ठेकेदारांचे देखील भागते. त्यातून सर्वसामान्य नागरिक इंग्रजाच्या काळातील कामे आजही उत्तम असल्याचे बोलतात. त्यात चूक काय?