डोर्लेवाडी, (पुणे) : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज बीजयात्रेत १० ते १२ जणांचे तब्बल ८ ते ९ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या जत्रेत काही नागरिकांनी चोर महिला व संशयित व्यक्तींना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. पोलीस त्यांना ठाण्यात घेऊन गेले. मात्र, त्यांच्याकडे कोणताही तपास न करता, त्यांना सोडून दिल्याची माहिती नागरिकांनी दिली. पोलिसांनी तक्रारदारांनाही अजब उत्तर दिले. यामागे गौडबंगाल काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. नागरिकांनी बारामतीच्या पोलिसांविषयी संताप व्यक्त केला आहे.
यात्रेतील कार्यक्रम पाहण्यासाठी महिलांसह परिसरातील नागरिकांनी खूप गर्दी केली होती. त्यात महिला भाविकांचे प्रमाण अधिक होते. उपस्थित असलेल्या भाविक महिलांपैकी काहींची मंगळसूत्र आणि दागिन्यांची ९ लाख रुपयांची चोरी झाल्याचे आढळून आले. चोरी झालेले तक्रारदार याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता, अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोर्लेवाडीत तुकाराम महाराज बीज व गावाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या यात्रेत पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होतात. या दिवशी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या गर्दीत महिलांच्या गळ्यातील तसेच काही व्यक्तींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसका देऊन चोरी केले आहेत. याबाबत संबंधित नागरिक रात्री उशिरा बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी असलेल्या पोलीस अंमलदाराने तक्रारदारांचे म्हणणे ऐकले व त्या १० ते १२ जणांनी तक्रार देण्यापेक्षा एकाने तक्रार द्या, इतर
सर्वांची एकत्र सही करून तक्रार नोंदवून घेतो, असे उपस्थित असलेल्या नागरिकांना सांगितले.
रात्रीचे बारा वाजलेले असल्याने त्याठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी कागदावर अर्ज केला व घरी निघून आले. मात्र, दुसऱ्या दिवशी काही तक्रारदारांनी गुन्हा दाखल केला असून, अहवाल मागवला आहे. या वेळी त्या व्यक्तीने माझी कोणतीही तक्रार नाही असे लिहून दिल्याचे अजब उत्तर पोलिसांनी इतर तक्रारदारांना दिले. तसेच तक्रार देणारी व्यक्ती रात्रीच या ठिकाणावरून निघून गेल्याची माहिती दिली. दरम्यान, याबाबत इतर तक्रारदारांनी बारामतीच्या पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करून संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, या जत्रेत काही नागरिकांनी काही चोर महिलांना व काही व्यक्तींना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. मात्र, पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन त्यांच्याकडे कोणताही तपास न करता त्यांना सोडून दिल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचे गौडबंगाल काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गर्दीच्या वेळी पोलीस मोबाईल पाहण्यात व्यग्र…
यात्रेच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीत पोलिसांनी बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते. मात्र, याच पथकातील पोलीस हे घोळका करून मोबाईल पाहण्यात व्यग्र होते. याबाबत एका जाणकार व्यक्तीने चोरांबाबत माहिती दिली असता त्या ठिकाणावरून उठून पुढे गेले.
मागील वर्षीचा तपास अद्याप नाही…
मागील वर्षी जत्रेतच संदीप जाधव यांच्या घरातून तब्बल एक लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने व काही वस्तू चोरी झाल्या होत्या. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र अद्याप चोरीचा तपास लागू शकला नाही.
याबाबत बोलताना बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे म्हणाले की, चोरीच्या घडलेल्या घटना घडल्या असून, याबाबत संबंधित तक्रारदाराने तक्रार परत द्यावी. तसेच पकडलेल्या महिला व पुरुष यांच्याकडे कोणताही मुद्देमाल आढळून आला नसल्याने त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले आहे.