पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात जॅपनीज इनसिफॅलायटिस (मेंदूज्वर प्रतिबंधक) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. अवघ्या 12 दिवसांत 1 ते 15 वर्षे वयोगटातील एक लाख 04 हजार 540 हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली. जे.ई. लसीकरण मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये राबवली जात आहे.
शहरातील सर्व मुला-मुलींचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. लस पूर्ण प्रशिक्षित वैद्यकीय पथकांमार्फत देण्यात येत असून, लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम सहसा आढळून येत नाहीत. त्यामुळे 1 ते 15 वर्षे वयोगटांतील सर्व लाभार्थीनी ही लस घ्यावी, असे आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी केले आहे. पुणे शहर कार्यक्षेत्रामधील सर्व अंगणवाडी व शाळांनी जे. ई. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नजीकच्या आरोग्य केंद्रात अथवा क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.