पुणे : आज (१० जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात दोन्ही पक्षांकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा मेळावा हा बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा मेळावा बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे. शरद पवारांचा मेळावा सकाळी दहा वाजता सुरु झाला असून, शरद पवारांसह मोठे नेते या मेळाव्याला हजर आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार काय महत्वाच्या सूचना देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचदरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठी घोषणा करत सर्वांना धक्का दिला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी त्यांनी 9 जानेवारी 2025 रोजी थोडे दिवस थांबा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमात त्यांनी याचे संकेत दिले आहेत.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करत असताना जयंत पाटील म्हणाले की, ‘शरद पवारांनी मला संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून 7 वर्ष राहिलो, जबाबदारी सांभाळली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता आहे. पुढे ते असंही म्हणाले की, ‘शरद पवार अंतिम निर्णय घेतील.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत मात्र, मोठ्या आवाजात घोषणाबाजी सुरु झाल्या. अशातच आता जयंत पाटील लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून देण्यात आली होती. जयंत पाटील हे जवजवळ सात वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकरत आहेत.







