मुंबई : आज मुंबईच्या लोकलला लाईफलाईन नाही तर डेथलाइन बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे काल मुंब्र्यात झालेल्या अपघातानंतर मुंबईची लोकल पुन्हा एकदा चर्चेत आली आणि लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मुंब्र्यात घडलेल्या या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत धडक मोर्चा काढला आहे. मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने आज ठाण्यातील गावदेवी मैदान ते रेल्वे स्टेशनपर्यंत धडक मोर्चा काढला आहे. या मोर्चात मनसेने मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्डाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे. मनसेच्या आंदोलनादरम्यान, कोणत्याही प्रकराची घटना टाळण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, 9 जून 2025 रोजी सकाळी नऊच्या सुमारास मध्य रेल्वेमार्गावर पुष्पक एक्स्प्रेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना रेल्वेमधून काही प्रवासी खाली ट्रॅकवर पडले. या घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर मृत्यूच्या आकड्यात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना इतकी भयानक होती की, काही नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर लोकने प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, नागरिक आता सरकारकडे सुरक्षित प्रवासाची मागणी करत आहेत.







