अमरावती : काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरु करण्यात आले होते. या ऑपरेशन टायगरचा आता रिझल्ट यायला लागला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील निष्ठावान नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वीच सांगलीतील पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. आता आणखी दोन निष्ठावंतांनी शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे.
अमरावती जिल्ह्यातील उबाठाचे दोन वेळचे आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि त्यांचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. धाने पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अमरावतीत ठाकरेंची ताकत कमी होणार हे नक्कीच. तसेच अमरावतीच्या राजकारणाला देखील नवे वळण येणार असल्याचे चित्र दिसत आहे.







