पुणे: शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणं सोपं नाही, कोल्हे यांनी लोकसभेत सर्वाधिक प्रभावी पद्धतीने प्रश्नांची मांडणी केली आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं. अमोल कोल्हे यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघात अधिक प्रोत्साहन द्याल असा मला विश्वास आहे. काहींनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं, तुम्ही आव्हान देता पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, “आज काही लोकं अमोल कोल्हे यांचा पराभव करायचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरापर्यंत पोहचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची खरी ओळख कोल्हेंनी जनतेला करून दिली. तसेच आण्णाजी पंत कोण आहे? याची ओळख करण्याचे कामही त्यांनी केलं. अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे. शिवस्वराज्य यात्रेची कल्पना मी अमोल कोल्हे यांना दिली होती, तेव्हा आमदार अमोल मिटकरी देखील आमच्या बरोबर असायचे. त्यावेळी आम्ही 54 आमदार निवडून आणले.”
अमोल कोल्हे यांचे अभिनंदन यासाठी की देशातील आणि राज्यातील अनेक खासदार कदाचित वेगळे प्रश्न मांडत असतील, पण सगळ्यात प्रभावी मांडणी कोणी लोकसभेत केली असेल कोल्हे यांनी केली. नुसतं युट्यूबवर अमोल कोल्हे आणि त्यांची लोकसभेतील भाषण ऐका मग समजेल. अमोल कोल्हे हा मोर्चा घेऊन सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्न घेऊन आले आहेत. मला वाटलं होतं की संसदेतील खासदार असा शेतकरी आक्रोश मोर्चा काढतोय की राज्यातील नेत्यांनी त्यांची दखल घ्यावी, असंही जयंत पाटील म्हणाले.