पुणे : मराठा आंदोलक हे आज पुण्यातील देहू दौऱ्यावर आहेत. देहू येथे जरांगे यांची रॉयल एन्ट्री झाली. देहूच्या प्रवेशद्वारापाशी त्यांच्यावर जेसीबीने फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सद्बुद्धी सरकारला द्यावी, असे साकडे जरांगे यांनी तुकोबाचरणी घातले. आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर देखील जरांगे यांनी जोरदार टीका केली. म्हातारं माणूस आहे, म्हणून मी शांत होतो. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर यांचे काही खरे नाही, असा थेट इशाराच जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला.
या वेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारला सद्बुद्धी द्यावी हेच साकडे तुकोबाचरणी घातले. महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आहे. यांना दोन अंग आहेत. क्षत्रिय मराठा आणि शेती करणारा, म्हणजेच कुणबी मराठा. याच माझ्या समाजाला सरकारने लवकरात लवकर सरकारने शंभर टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे, अशी माझी इच्छा आहे.
मनोज जरांगे पाटील यांची देहूमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला. ते म्हणाले की, माझं लेकरू अधिकारी बनेल अन माझे कष्ट कमी होतील, असे आजपर्यंत मराठा समाजबांधव समजत असत. मात्र, राजकारण्यांच्या षडयंत्रामुळे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. मराठ्यांवर पाठीमागून विश्वासघाताचे वार होत होते, मात्र याची त्यांना कल्पना नव्हती. मराठ्यांमुळे जे मोठे झाले, ते कधीच मराठ्यांच्या मदतीला धावून आले नाहीत. मराठ्यांची मुले शेतातच राहिली. यानी काय पाप केले हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय.
मराठा आरक्षणाच्या लढ्याला होत असलेल्या विरोधावर देखील त्यांनी भाष्य केले. याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते, पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र, आता व्यक्ती म्हणून सुद्धा माझा विरोध आहे. त्यांनी कितीही उचकवले तरी शांत रहा. हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही, तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे.
मुंबईतून आल्यावर यांनी काय केले? येवल्यातून आल्यावर काय केले? हे सर्व मला माहीत आहे. म्हातारा माणूस आहे, म्हणून मी शांत होतो. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर यांचे काही खरे नाही, असा थेट इशाराच जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर पुढची दिशा ठरवू. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचे नाही, असे म्हणत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.