उरुळी कांचन, (पुणे) : सिमेंटचे पाईप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी 1 लाख 40 हजार रुपये किमतीची लोखंडी चाके अज्ञात चोरट्यांनी कारखान्यातून चोरून नेल्याची घटना घडली आहे. नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आदीरा इंटप्रायजेस या कारखान्यातून 18 जुलैला संध्याकाळी ही घटना घडली. याप्रकरणी समीर राजेंद्र चौधरी (वय 30, व्यवसाय पाईप कंपनी मालक रा. नायगाव ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर चौधरी यांची नायगाव गावच्या हद्दीत शेतजीमन असून त्याठिकाणी पत्नी प्राची चौधरी यांनी आदीरा इंटप्रायजेस नावाचा सिमेंट पाईप बनवण्याचा कारखाना गेल्या 1 महिन्यापूर्वी सुरू केला होता. दरम्यान कारखान्यातील फिटींगच्या मोकळ्या जागेवर ठेवलेल्या 90 मोल्डच्या चाकांपैकी काही चाके दिसून येत नसल्याची माहिती कामगार महादेव शर्मा याने 19 जुलैला सकाळी फोन करून फिर्यादींना दिली.
सदर ठिकाणी जात फिर्यादींनी कामगार शर्मा यांच्याशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, दररोजप्रमाणे सर्वांनी आपली कामे उरकून रात्री 11 वाजता कारखान्याची पाहणी केली, त्यावेळी मोकळ्या जागेमध्ये सर्व चाके होती. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. सकाळी 6 वाजता कामगार उठले व त्यांनी कारखान्याची पाहणी केली असता कारखान्यातील 90 मोल्डच्या चाकांपैकी 20 मोल्डची चाके दिसुन आली नाहीत.
दरम्यान, आजूबाजूच्या पिंकांमध्ये चाकांचा शोध घेतला असता चाके मिळुन आली नाहीत. यावरून कारखान्यातील 1 लाख 40 हजार रुपये किमतीची चाके चोरल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार रमेश भोसले करीत आहेत.