राजेंद्रकुमार शेळके
पिरंगुट : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘योग प्रात्यक्षिका’चे आयोजन करण्यात आले होते. २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ ही संकल्पना घेऊन हा दिवस महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नियमितपणे योग करण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी आपल्या जीवनामध्ये योग कशाप्रकारे महत्त्वाचा आहे हे सांगितले. स्वतः बरोबरच कुटुंबासाठी योग महत्त्वाचा आहे, हे सांगताना आपल्या वैयक्तिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक, आत्मिक समाधानाची पूर्ती देखील योगसाधनेमधून होत असते.
योग हा विद्यार्थी, पालक, प्रौढ या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. या दिनाचे औचित्य साधून सर्वांनी योग करणे महत्त्वाचे आहे, असे मत अभय खंडागळे यांनी मांडले. केवळ आजच्या दिवसापुरता योग न करता सातत्याने तो केला जावा यासाठी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक यांमार्फत योगाची प्रात्यक्षिके दिली जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या योग दिनाच्या निमित्ताने प्रा. अनिल मरे यांनी ‘आरोग्यासाठी योगसाधना’ या विषयावर व्याख्यान दिले. प्रात्यक्षिकांसाठी योग सादरीकरण करून उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. तसेच सूर्यनमस्कार आणि मणक्याच्या व्याधीसाठी उपयोगी असणाऱ्या योगाचे प्रकार, व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग प्रात्यक्षिक करणाऱ्यामधून उत्कृष्ट योग करणाऱ्या महिला प्राध्यापक, पुरुष प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले.