पुणे : इतिहासात स्त्रियांचे समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि भविष्यात अजूनही मोठे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण सर्वजण या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा वापर करून सर्वांसाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करू शकतो. त्यांना नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकवण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो, असे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा कवी रामदास गवराम पुजारी यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण डाक विभाग, शिवाजीनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रामदास गवराम पुजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे ग्रामीण विभागाचे डाकघर अधीक्षक बाळकृष्ण एरंडे हे होते. यावेळी पुजारी यांनी भाषण करताना ‘स्त्री भविष्य आहे आणि ते साध्य होईपर्यंत, महिलांना समान बुद्धिमत्तापूर्ण संधी, प्रतिनिधित्व आणि प्रभाव असलेल्या भविष्याचे स्वप्न पाहण्यापासून आपण थांबवू शकत नाही. ज्यामुळे सर्वांसाठी अधिक न्याय आणि समान समाज निर्माण होईल’.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘जर तुम्ही समाजात प्रगतीची क्षमता असल्याचे मानत असाल, तर महिलांना सक्षम करणे आणि लैंगिक समानतेला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनापेक्षा चांगला दिवस नाही. इतिहासात स्त्रियांचे समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि भविष्यात अजूनही मोठे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे, आपण सर्वजण या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा वापर करून सर्व जणांसाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करू शकतो, त्यांना नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकवण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो.
यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद करताना समाजामध्ये पर्यावरणविषयक जाण व पर्यावरणपूरक जीवनशैली निर्माण करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर योगदान देऊ शकतात, असा संदेश दिला. याप्रसंगी पुजारी यांनी उपस्थित सर्व महिलांना त्यांनी स्वतः लिहिलेला व प्रकाशित केलेला कवितासंग्रह ‘उद्याच्या श्वासासाठी’च्या प्रती भेट दिल्या.
बाळकृष्ण एरंडे यांनी अध्यक्षीय भाषणात असे सांगितले की, ‘आजच्या काळात महिलांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे आणि त्या सर्व प्रकाराच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी आहेत. डाक विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत असून, विभागाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे’, असे सांगितले.
कार्यक्रमास सुकदेव मोरे, सहायक अधीक्षक (मुख्यालय) पुणे ग्रामीण विभाग, विभागीय कार्यालय तसेच शिवाजीनगर प्रधान डाकघरातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते