पुणे : पुणे जिल्हा बॅंकेची १०५ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.३०) पुण्यातील अल्पबचत भवन येथे घेण्यात आली. यावेळी बॅंकेचे संचालक व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पीककर्जाची व्याज सवलत बंद होणार असल्याची माहिती दिली.
“पुणे जिल्हा बॅंकेला मिळणाऱ्या नफ्यातून बॅंक वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना विविध योजनेअंतर्गत व्याज सवलत देते. केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेनुसार तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पीककर्ज उपलब्ध होते. मात्र, बॅंकेने तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याच्या निर्णयाचे परिपत्रक मागे घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जाची व्याज सवलत बंद होणार आहे,’’ अशी माहिती बॅंकेचे संचालक व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, ‘‘बॅंकेमार्फत तीन लाख रुपयापर्यंत सवलतीच्या व्याज दराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून बॅंकेस दोन टक्के व्याज परतावा प्राप्त होतो. मात्र, ८ सप्टेंबरच्या राष्ट्रीय बॅंकेच्या परिपत्रकानुसार या योजनेत बदल करून पुढील दोन वर्षांसाठी केंद्राकडून बॅंकेस दोन टक्केंऐवजी दीड टक्केच व्याज परतावा प्राप्त होईल. त्यानुसार बॅंकेस प्रतिवर्षी वितरण होणाऱ्या पीक कर्जापोटी ७ ते ८ कोटींची रक्कम कमी प्राप्त होईल. अशीच स्थिती राज्यातील सर्व बॅंकांची होईल. यावर ठोस पावले उचलण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात लक्ष वेधले जाईल.’’
‘‘बॅंकेकडून २५ साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी बॅंकेने ९५.५ टक्के प्रमाणात कर्जाचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्पातून साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीत भरीव वाढ होत आहे,’’ असेही पवार म्हणाले.