पुणे : मुंबईतील वरळी परिसरातील जांबोरी मैदानात भाजपकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केला आहे.
या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा सचिन अहिर यांनी शेअर केला आहे. मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्याच्या सत्कारासाठी मराठी कलाकारांचा अपमान केल्याने सोशल मीडियातही टीका करण्यात येत आहे. सचिन अहिर यांनीही ट्विट करत म्हटलं “हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!! भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा.”.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पुन्हा जावे आणि पुन्हा एकदा नाव बदलून घ्यावे. माझं असं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या पक्षाचं नाव रडकी सेना ठेवावे. काहीही झालं तरी रडत असतात. स्वत: काही करायचं नाही. मराठी माणसासाठी कार्यक्रम करायचे नाही आणि करता आले नाहीत हे अपयश लपवण्यासाठी रडायचं हाच धंदा सुरू केला आहे. राहुल देशपांडे यांचा कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठमोळ्या दीपोत्सवात सिनेसृष्टीतील हिंदी कलाकार येत आहेत हा मराठी माणसासाठी अभिमानाचा विषय आहे.
नेमके काय झाले?
गायक राहुल देशपांडे यांचे गायण सुरू असताना बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याची एन्ट्री होते. टायगर श्रॉफ येताच मंचावरुन एक अनाउन्समेंट करण्यात येते की, आपण पाच मिनिटांचा ब्रेक घेऊयात. तसेच राहुल देशपांडे यांना गाणे थांबवण्यास सांगण्यात येते. हा सर्व प्रकार पाहुन राहुल देशपांडे यांनी सांगितले की, त्यांना 20 मिनिटे थांबायला सांगा मी 20 मिनिटांत माझे गाणे संपवतो. नाहीतर मी गाणे थांबवतो.