पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा दिवसाढवळ्या निर्घृण खून करण्यात आला. अगदी खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम एकमेकांसोबत सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच, शरद मोहोळसाठी यम दूत म्हणून आले आणि घेऊन गेले. मुन्ना उर्फ साहिल पोळेकर असं या साथीदाराचं नाव आहे. पण त्याने आपल्या साथीदारांसोबत या हत्तेचा कट का रचला? त्याने दोस्तीत कुस्ती का आली? हा आरोपी मुन्ना पोळेकर आहे तरी कोण? हे जाणून घेऊयात.
पाच जानेवारी दुपारी कोथरुडच्या सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ घराबाहेर पडल्यानंतर त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. एक प्रकारे मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती झाली. मोहोळच्या सावलीप्रामणे सोबत असणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच पाठीत खंजीर खुपसला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळचा जवळचा दोस्त होता. शरद मोहोळचा पाठीराखा बनून त्याच्याच पाठीत त्याने खंजीर खुपसला.
मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याचे वय अवघं 20 वर्ष आहे. तो मूळचा मुळशी तालुक्यातील आहे. तो शरद मोहोळच्या जवळचा म्ह्णून ओळखला जायचा. मुन्नाचे आणि शरद मोहोळचे पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. मात्र, हे हत्येसाठी हे प्रमुख कारण नव्हते. हा वाद फार जुना आहे.पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका जमीनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीनंतर सांगितले जात आहे. पैसा ही अशी गोष्ट आहे जी सख्ख्या नात्यातही विष कालवते. अगदी रक्ताची नातीही क्षणात संपवते आणि याच पैशापायी शरद मोहोळलाही कायमचं संपवलं. तेही त्याच्या जवळच्या अशा साथीदारांनी.
मुन्नाच्या या गुन्ह्यात त्याचा मामा नामदेव कानगुडे हा सहभागी झाला होता. जेव्हा मोहोळचा काटा काढायचं ठरलं तेव्हा कानगुडेही या कटात सहभागी झाला. शरद मोहोळने अनेकांशी शत्रुत्व ओढावून घेतलं होतं. त्याच एकमेव कारण म्हणजे जमीनीचा व्यवहार. जमिनीच्या व्यवहारातून मुन्नाच्या मामाचे आणि मोहोळचे खटके उडाले होते. मामाने भाच्याला मोहरा बनवत मोहोळला संपवण्याचा डाव आखला.
त्यानंतर शरद मोहोळच्या हत्येच्या डाव फत्ते करण्यासाठी मुन्नाला मोहोळच्या टोळीत पाठवलं. मुन्ना दिसायला तर मोहोळचा जवळचा पाठीराखा होता. परंतु, खऱ्या अर्थाने तो विरोधी गटाचा टीपर होता. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ गँगच्या सोबत महिन्याभरापासून टोळीचा सदस्य म्हणून काम करत होता. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळपासून मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ हे एकत्रच होते.
पाच जानेवारी हा शरद मोहोळच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा दिवस होता. कारण या दिवशी मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे तो दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला निघाला होता. नेहमीप्रमाणे त्याचे जवळचे साथीदार सोबत होते. घरापासून काही दीडशे मीटर अंतर दूर आला आणि साथीदारांनीच त्याचा गेम केला. पळ काढल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केवळ 8 तासांत शिरवळला पळून जात असतानाच या आरोपींना बेड्या ठोकल्या.
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात चर्चांना उधाण आलं. ज्या हत्याराच्या आधारानं त्यानं आजवर आपली दहशत पसरवली. आज तेच हत्यार मोहोळच्या जीवावर बेतलं. या हत्येमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात नव्या बकासुराची एन्ट्री झाली का असाही प्रश्न या निमित्तानं समोर आला आहे.