पुणे : दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत डोक्याला जखम झाल्याने ज्येष्ठ नागरिकाला पुण्यातील इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डोक्यातून रक्तस्त्राव जास्त झाल्याने डोक्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटावर व गुप्तांगावर भाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामुळे इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरालाल सारवान (वय ७०, रा. दौंड) असे जखमी झालेल्या रुग्णाचे नाव आहे. तर याप्रकरणी मुलगा अॅड. सुरेश सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सारवान हे एक सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. ते नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी सायंकाळी जातात. व्यायाम करुन घरी येत असताना बुधवारी (ता.४ जानेवारी) रात्री त्यांना एका दुचाकीस्वाराने धडक दिली. तेव्हा हिरालाल सारवान हे खाली पडले.
आणि या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना प्रथम दौंड रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, तेथे सिटी स्कॅन केल्यावर डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांना गुरुवारी (ता. ५ जानेवारी) मध्यरात्री पुण्यातील इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन चांगले झाले. पण, आता आयसीयुमध्ये तुम्ही भेटू शकत नाही, असे सांगितले. दुसर्या दिवशी फिर्यादी मुलगा अॅड. सुरेश सारवान ही आई समवेत वडिलांना भेटायला गेले. तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. तेव्हा त्यांच्या पोटावर, हातावर, गुप्तांगावर भाजल्याचा खुणा दिसून आल्या.
त्यानंतर फिर्यादी अॅड. सुरेश सारवान यांनी डॉ. महेशकुमार यांच्याकडे विचारणा केली असता, हिरालाल सारवान यांचे शरीर थंड पडल्याने त्यांना गरम करण्यासाठी लावलेली गरम पाण्याची पिशवी लिकेज झाल्याने त्यांच्या पोटाला, हातास व गुप्तांगाला भाजले असून आता सध्या नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसर्या दिवशी ही जखमी आणखीच चिघळल्याचे दिसून आले.
ही बाब समजल्यावर पुण्यातील वकिल अॅड. तोसिफ शेख, अॅड. क्रांती सहाने, अॅड. स्वप्नील गिरमे, अॅड. दीपक गायकवाड, अॅड. महेश गवळी, अॅड. जयदीप डोके पाटील, अॅड. मोहम्मद शेख, अॅड. शिवानी गायकवाड, अॅड. विश्वजीत पाटील तसेच आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष आय टी भाई शेख, आझाद समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई गायकवाड यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
त्यांनतर कोरेगाव पार्क येथे जाऊन पोलीस अधिकार्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.