हडपसर (पुणे) : लोणी काळभोर व वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या हडपसर येथील एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले.
कुणाल ऊर्फ बाब्या प्रल्हाद ठाकूर (वय २३, रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २६) गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंगची गस्त घालीत असताना युनिटकडील अंमलदारास रेकॉर्डवरील अटल गुन्हेगार कुणाल ऊर्फ बाब्या ठाकूर हा इंद्रप्रस्थ लॉन्सकडून भापकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असून, त्याच्याकडे चोरीचे दागिने असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याने अंगात राखाडी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. आडबाजूला थांबून नमूद वर्णनाची व्यक्ती संशयितरित्या उभा असल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला युनिटकडील पथकाने पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव व पत्ता वरीलप्रमाणे सांगितला.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वानवडी येथे १ व लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी कुणाल ठाकूर याच्याविरुद्ध यापूर्वी येरवडा, हडपसर, लोणावळा सिटी पोलीस ठाण्यात घर फोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, शेखर काटे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.