पुणे: पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे साधू भिक्षुकाचा वेष परिधान करून संमोहनाद्वारे लूटमार करणाऱ्या पंजाबमधील दोन तरुणांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मनी फर्नेश नाथ आणि अर्जुन साथ नाथ (दोघे रा. शेरपूर, ता. धुरी, जि. संगरूर, पंजाब) यांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी (दि.9) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव केतकी येथील संत सावतामाळी प्रतिष्ठानच्या व्यापारी गाळ्यातील सचिन धन्यकुमार दोषी यांच्याकडे मनी व अर्जुन नाथ हे दोघे गेले. तेथे सचिन दोषी हे एकटेच होते. त्यांनी दोषींना कोपऱ्यात नेऊन त्यांना संमोहित केले. संमोहित करून त्यांना अंगठ्या व पाकीट काढून देण्यास भाग पाडले. हा प्रकार घडत सतानाच सुदैवाने याचवेळी तेथे उत्तम भोंग, तुकाराम भोसले हे दोघे आले. त्यावेळी संशयीत दोघांनी त्यांना आत येण्यास विरोध केला. त्यानंतर भोसले यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट करण्यास सुरुवात केली असता आरोपींनी तेथेच ऐवज टाकून घटना स्थळावरून पळ काढला.
सदर घटनेची माहिती पोलिस पाटील अतुल डोंगरे यांना कळताच त्यांनी तत्काळ संबंधितांची छायाचित्रे गावातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर व्हायरल केली. काही वेळातच पोलिस पाटील डोंगरे यांना ते दोघेही ज्या भागात आहेत त्याची माहिती मिळाली. त्यानुसार ग्रामस्थांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान इंदापूरचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी जीवन बनसोडे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्या दोघांना मूळ गावी रवाना केले.