इंदापूर: येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह, अपक्ष उमेदवार संपूर्ण मतदार संघ प्रचारादरम्यान पिंजून काढत आहेत. आता मतदानाला केवळ नऊ दिवस शिल्लक असल्याने प्रचाराला वेग आला आहे. यावेळी इंदापूर मतदारसंघातील निवडणूक तिरंगी लढतीमुळे रंगतदार होणार आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने या तिघांमध्येच खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात मोठे धक्के देण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे कामाला लागल्याची चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, वसंत मोहोळकर, कांतीलाल झगडे आणि देवराज जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेला इच्छुक असणाऱ्या कार्यकत्यांची फोडाफोडी सुरु केली आहे. त्यातूनच इंदापूरच्या पुढील राजकारणाची रणनीती ठरणार आहे.
आमदारकीच्या पहिल्या टर्मच्या कालावधीत तालुक्यात प्रथम भरणे यांनी बेरजेचे राजकारण साधत श्री क्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील मंदिर तसेच पर्यटनाचा प्रश्न मार्गी लावला. तर दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी बांधकाम, वने व मत्स्य खात्याचे राज्यमंत्री पद काही काळ भूषविले. त्याचबरोबर भरणे यांनी ५ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची कामे मार्गी लावली. त्यात प्रामुख्याने उजनी धरणाच्या भीमा नदीवरील इंदापूर व करमाळा तालुक्यास जोडणारा पूल, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची गढ़ी संवर्धन, चांद शहावली बाबा दर्गा सुशोभीकरण, इंदापूर न्यायालयाची सुसज्ज इमारत, लाकडी निबोडी उपसा जल सिंचन पाणी पुरवठा योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रस्ताव मंजुरीवर सही घेवून ती मार्गी लावणे आदी लक्षवेधी कामांचा समावेश आहे.
मात्र, सोबत असलेले कार्यकर्ते जगविताना त्यांना उप ठेकेदार म्हणून दिलेल्या काही कामाची तसेच काही रस्त्यांची कामे दर्जाहीन झाली असून काही रस्ते उखडले आहेत, तर जल जीवन मिशनच्या कामाबद्दल तालुक्यात खूप नाराजी असल्याचे चित्र आहे. इंदापुर तालुक्यात संथ गतीने सुरू असलेल्या पालखी महामार्गाच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. तालुक्यातील सर्व सामान्य जनोपर्यंत त्यांनी वैयक्तिक लाभाच्या पोहोचवलेल्या योजना, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खंभीर पाठबळ, त्यांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सोसायट्या, छत्रपती सहकारी साखर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेली विकासकामे या भरणे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
दरम्यान महायुतीमध्ये ऐनवेळी उमेदवारीची अडचण झाल्यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी मिळवली. इंदापूरच्या या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मूळ कार्यकत्यांसह नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. तर हर्षवर्धन पाटील यांचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या कामगिरीवर विजयाचे समीकरण अवलंबून आहे.
आमदार दतात्रय भरणे यांना कोणाचाही थेट विरोध नसला तरी दुसऱ्या फळीतील स्थानिक नेत्यांवर नागरिक नाराज असल्याचे दिसून येते. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर मतदारसंघांमधील असलेली नाराजी मतांमध्ये बदलण्याचे मोठे आव्हान भरणे यांच्यासमोर असणार आहे. याउलट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे सत्तेच्या काळात सत्ता भोगणारे नेते सोडून गेल्याने पाटील यांच्या भोवती सहानुभूतीची एक लाट तयार झाली असल्याचे दिसून येत आहे.
तसेच सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने यांच्याकडे देखील एक दोन मोठ्या नेत्यांनी प्रवेश करत, प्रचारात टीकेची राळ उडवलेली आहे. माने यांना युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद माने यांच्या पाठीशी दिसून येत आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये मतविभागणी कशी होते, हे पाहणे महत्वाचे आहे.
आगामी दोन दिवसांत महाविकास आघाडी, महायुती या वरिष्ठ राजकीय पक्षांचे नेते इंदापूर तालुक्यात सभा घेणार आहेत. त्यावेळी यापेक्षा आणखी वेगळे वातावरण पाहायला मिळणार आहे. खुद्द शरद पवार यांनी या विधानसभा मतदारसंघात जास्तीचे लक्ष घातल्यामुळे ते हर्षवर्धन पाटलांसाठी लाभदायक मानले जाते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राजकीय आयुधे वापरत, इंदापूर मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवले आहे. सध्याच्या घडीला इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे.