न्हावरे,ता.३१: आंधळगाव (ता.शिरुर) येथील परिसरातील वडाच्या तळ्याच्या कडेला बकरी धूत असताना पाय घसरून पाण्यात बुडून एका मेंढपाळचा मृत्यू झाला आहे. साहेबराव चांगदेव पांढरे (वय-३३ वर्ष, रा.आंधळगाव, ता.शिरुर, जि.पुणे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. या घटनेची दादा सखाराम पांढरे (वय-३३वर्ष, रा.आंधळगाव, ता.शिरुर जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यास खबर दिली आहे.घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता दादा पांढरे, आण्णा पांढरे आणि त्यांचा चुलतभाऊ साहेबराव पांढरे हे तिघे जण आंधळगाव येथील वडाच्या तळ्यामध्ये बकरी धुण्यासाठी गेले होते. सर्व जण तळ्याच्या कडेला बकरी धूत असताना,साहेबरावही त्याची बकरी धूत होता. त्यावेळी अचानक साहेबराव याचा पाय घसरल्याने साहेबराव तळ्यामध्ये पाण्यात पडला त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला मात्र, यावेळी दादा पांढरे व अण्णा पांढरे यांनी साहेबरावचा पाण्यामध्ये डुबकी मारून शोध घेतला असता साहेबराव सापडला नाही.
दादा पांढरे यांनी सतिष ठोंबरे यांना मदतीसाठी फोन करून बोलावून घेतले. सतिष ठोंबरे यांनी तळ्यात जाऊन साहेबराव याला तळ्याच्या तळातून बाहेर काढले. त्यावेळी साहेबराव बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे वैद्यकीय मदतीसाठी साहेबराव पांढरे याला न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साहेबराव याची तपासणी केली असता साहेबरावाचा मृत्यू झाला आहे असे सांगितले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलिस करत आहेत.