राहुलकुमार अवचट
यवत : आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केडगाव येथील नेताजी शिक्षण संस्थेच्या सुभाष बाबुराव कुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये नुकतेच संपन्न झाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन सोहळा पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फूड प्रोसेसिंग व एचआर एक्झिक्युटिव्ह या दोन क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने केडगाव येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव धनाजी शेळके यांनी मोफत शिक्षण व नोकरी या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याचा मानस असल्याचे सांगितले. कुशल रोजगारक्षम महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी पदवी पुरेशी नसून त्याबरोबरच विविध प्रकारचे कौशल्य असणे गरजेचे आहे. या पदवी कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर करू शकतात, अशी अपेक्षा प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केली.
या कौशल्य विकास केंद्रासाठी समन्वयक म्हणून प्राध्यापक ओंकार अवचट तर सहकारी प्रा. विशाल दिवेकर हे असून यावेळी सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.