पुणे : वडगाव शेरी परिसरात भर रस्त्यात कोयत्याने धुडघूस घालणाऱ्या आरोपींना एकट्या महिला पोलीस हवालदाराने पकडले. रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली असतानाही तिला कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. पोलीस येईपर्यंत महिलेने गुंडाला पकडून ठेवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि २० मिनिटांत इतर आरोपींना अटक झाली. एखाद्या बॉलीवूडपटालाही लाजवेल असा थरार वडगाव शेरीत घडला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर टोळक्याकडून कोयता, दगड आणि विटांनी हल्ला सुरु होता. रात्री अकरा वाजता भर रस्त्यात होत असलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. परंतु कोणीही गुंडाला आवर घालण्यासाठी मध्ये पडायला तयार झाले नाही. त्याचवेळी पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलीस हवालदार सीमा वळवी घरी जात होत्या. त्यांनी हा प्रकार पाहिला. करारी आवाजात मारहाण करणार्यांना गुंडांना दरडावले. पोलिसी खाक्या दाखवताच काही गुंडांनी घटनास्थळावरुन पळ काढला. परंतु एका आरोपीने पोलिसांनाही न जुमानता कोयता काढला. त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले.
गुंड आणि एकट्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची भर रस्त्यात झटापट सुरू होती. मात्र, कोणीही त्यांना मदतीसाठी आले नाही. वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. तसेच नंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या. मोठ्या हिंमतीने त्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन केला. चंदननगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर काही वेळेत पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. अवघ्या २० मिनिटांत पोलिसांनी मारहाण करणार्या आरोपींना बेड्या ठोकल्या. भर रस्त्यावर धुडगूस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवालदाराच्या साहसामुळे पकडले गेले. यामुळे या कारवाईचे कौतुक होत आहे. सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या. धाडसाने त्यांनी पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले.
राज्याचे गृहमंत्री व त्यांचे समर्थक दोन-चार टाळक्यांना पकडलं की लगेच पोस्टरबाजी करतात, पण अशा पोस्टरबाजीने हा प्रश्न सुटणार नाही. पुणे शहरात कधी कोयता तर कधी कुऱ्हाड घेऊन गुन्हेगार रस्त्यावर राजरोस फिरत आहे. हे इतकं होत असताना आपले कर्तव्यदक्ष गृहमंत्री तसेच पालकमंत्री गेलेत कुठे? हा प्रश्न सोसायटीतील महिलांना, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अन् रस्त्याने चालणाऱ्या वाटसरूंना पडलाय… अजून किती दिवस हा गुन्हेगारांचा हैदोस पाहावा लागेल, याचे उत्तर महाराष्ट्राला हवे आहे, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.