दौंड, (पुणे) : Daund News – राहू (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत एका पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास १० ते १५ जणांना जबरी चावा घेतला असल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिला व पुरुष या दोघांचाही समावेश आहे. (Daund News)
कुत्र्याने अनेक नागरिकांवर केला प्राणघातक हल्ला
दुकानातून सामान घेऊन येणाऱ्या, अंगणात खेळणाऱ्या, घरासमोर बसलेल्या, चौकातून घरी निघालेल्या अशा अनेकांवर कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांना ससून येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
काहींवर राहू येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण राहू परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीत वावरत आहेत. नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन राहू ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान,पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.