उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन ते अडीच महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने येथील विकासकामांना खीळ बसली आहे. बदली झालेल्या ग्रामसेवकाच्या जागेवर कार्यक्षम ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
दोन महिन्यांपासून ग्रामसेवक पद रिक्त असल्याने टिळेकरवाडी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामसेवक नसल्याने ग्रामविकासाच्या योजनांसाठी ग्रामपंचायत स्तरावरील निर्णय घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे ह्या गावाला ग्रामसेवक मिळणार का नाही असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
हवेली पंचायत समितीचे अधिकारी ह्या प्रकरणी ग्रामस्थांना वेठीस धरीत असून त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना रहिवासी प्रमाणपत्र, नमुना नंबर आठ “अ’चा उतारा, जन्म-मृत्यू यासारखे ग्रामपंचायत स्तरावर लागणारे कागदपत्रे ग्रामसेवकाअभावी ग्रामस्थांना मिळेनासे झाले आहेत. ह्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असते. यापूर्वीही परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत. ग्रामस्थांचा बिबट्याच्या संघर्षाने अथवा रोगराईने जीव गेल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार गटविकास अधिकारी यांना धरावे अशी ग्रामस्थांची भावना व्यक्त होत आहे.
दोन ते अडीच महिन्यांपासून टिळेकरवाडीला ग्रामसेवक नाही. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले ग्रामसेवक आमच्या गावात एक तास ते दीड तास बैठकीला येतात तालुका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्याने नागरिकांची कामे अडून राहत आहेत. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
-गोवर्धन टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य, टिळेकरवाडी (ता. हवेली)
याबाबत बोलताना हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी म्हणाले, ” सोमवार (ता. 09) पासून नवीन ग्रामसेवक देण्यात येणार आहे. मागील एक महिन्यांपूर्वी ग्रामसेवक दिले होते. ते रजेवर असल्याने आजपासून नवीन ग्रामसेवक देत आहोत.”