उरुळी कांचन, (पुणे) : अयोध्या येथे सोमवारी (ता.२२) होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्व हवेलीतील सर्वच ग्रामपंचायत हद्दीत राममय वातावरण झाले आहे. यामध्ये परिसरात राम नामाचा गजर सुरु आहे. याचबरोबर भगवे झेंडे, पताका, प्रभू श्रीरामांच्या भल्या मोठ्या फलकांमुळे नागरिकांना प्रती अयोध्येत वावरत असल्याचा भास होत आहे.
पूर्व हवेलीतील सर्वच ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरात राम नामाचा गजर सुरु असल्याने संपूर्ण वातावरण राममय झाले आहेत. याचबरोबर भगवे झेंडे, पताका, प्रभू श्रीरामांच्या भल्या मोठ्या फलकांमुळे नागरिकांना प्रती अयोध्येत वावरत असल्याचा भास होत आहे. सोमवारी होणारा हा सोहळा नजरेत साठवण्याबरोबरच त्यात प्रत्यक्ष सहभागी होता नाही आले, तरी त्याअनुषंगाने आयोजित स्थानिक पातळीवरील कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी सर्व ठिकाणी सुरु केली आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सजावटीसाठी देखील विविध वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. विविध प्रकारच्या राम मूर्ती, झेंडे, आकाशदिव्यांनी बाजारपेठ सजल्या आहेत. श्री राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे अनेकांनी मंदिराची स्वच्छता साफसफाई केली आहे. तसेच काहींनी मंदिरांवर, तर काहींनी घरावर सजावट, विद्युत रोषणाई केली आहे.
बाजारपेठेत देखील राम मंदिराच्या प्रतिकृतीसह विविध वस्तू, श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानाच्या प्रतिमा, झेंडे, तोरण, कापडी झेंडे, मफलर, टोपी, स्टिकर अशा वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच त्यांना मागणीही वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर काहींनी आतिषबाजीसाठी आत्तापासूनच फटाक्यांची खरेदी करून ठेवली आहे.
घराघरांतील अक्षता होणार अर्पण
अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. या अक्षता नंतर स्वयंसेवकांमार्फत गाव, वाडी, वस्तीवरील प्रत्येक घरांत पोचविण्यात आल्या आहेत. या अक्षता सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमानंतर घरातील देवतांना, तसेच ग्रामदेवतांना अर्पण करण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
उरुळी कांचन येथे रामकथा सप्ताह
उरुळी कांचन येथे श्री उरुळी कांचन देवस्थान संस्था व सप्ताह समिती, समस्त ग्रामस्थ उरुळी कांचन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने ह.भ.प. रुक्मिणी तारू महाराज यांची रामकथा कथाकथन या विषयावर राजा दशरथाला शाप की वरदान, प्रभू रामचंद्रांचा जन्म, विश्वमित्रांबरोबर प्रभू रामचंद्रांचे गमन, सिता स्वयंस्वर, प्रभू रामचंद्राचा वनव्ट्स प्रारंभ व सिता हरण, प्रभू रामचंद्र व हनुमंत भेट व लंका दहन, रावण वध व रामराज्याभिषेक रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत करण्यात आले. सोमवारी (ता. २२) ह.भ.प. चिंतामणी तारू महाराज यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ वाजता होणार आहे.