पुणे : रागाच्या भरात मारहाणीचे गंभीर प्रकार सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. एका माथेफिरूने मारलेला दगड डोक्याला लागल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार रामटेकडी परिसरात घडला. या तरुणीवर चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. या निरपराध तरुणीवर आतापर्यंत दोन ते तीन शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र, दगड मारणाऱ्या माथेफिरूचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही.
या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात माथेफिरूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ जानेवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास रामटेकडी येथील किर्लोस्कर पुलावर घडला.
अपघातग्रस्त तरुणी खराडी येथील एका कंपनीत नोकरीला आहे. ती चार जानेवारीला रात्री मैत्रिणीच्या दुचाकीवर पाठीमागे बसून घरी जात होती. त्या वेळी किर्लोस्कर पुलावर त्यांची दुचाकी आली असता, अचानक तरुणीच्या कपाळावर दगडाचा घाव बसला. त्यात तिची शुद्ध हरपली. मैत्रिणीने कुटुंबियांना या प्रकाराची माहिती देऊन तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. अद्यापही ती रुग्णालयातच आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या कुटुंबियांना पोलिसांनी सहकार्य केले नाही. तरुणीचे कुटंबीय जवळच्या वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांना ‘ती आमची हद्द नसून, तुम्ही हडपसर पोलीस ठाण्यात जा’ असे सांगण्यात आले. हडपसर पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. अखेर तरुणीच्या कुटुंबियांनी एका लोकप्रतिनिधीमार्फत पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर सात जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत या माथेफिरूने रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांना तसेच महिला बसलेल्या कारवर दगड मारल्याच्या तक्रारी आहेत. यात काही गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रामटेकडी येथे सातत्याने होत असलेले हल्ले थांबवणार कोण, असा प्रश्न पडला आहे. माथेफिरूच्या कृत्याचा माझ्या बहिणीला मोठा फटका बसला आहे. भविष्यात हा प्रकार कोणाच्या जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अपघातग्रस्त तरुणीच्या भावाने व्यक्त केली.