पुणे : पुण्यात गुन्हेगारीसह हुक्का पार्लर, पब कल्चरचा उच्छाद वाढत आहे. पबमधून बाहेर आलेले तरुण मद्यधुंद अवस्थेत डीजेच्या तालावर थिरकत रस्त्यावरच धिंगाणा घालत असल्याचे चित्र शहरातील अनेक परिसरांमध्ये दिसत आहे. शहरात मध्यरात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या धिंगाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.
रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरू ठेवणे नियमबाह्य आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा सुरू असतो. अनेक हॉटेल, पब, बारमध्ये उशीरापर्यंत पार्टी सुरू असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवान्याचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील १० नामांकित हॉटेलचा यामध्ये समावेश आहे.
पुण्यात अव्वल दर्जाचे शिक्षण दिले जाते. शिवाय मोठमोठ्या शिक्षण संस्थादेखील येथे आहेत. त्यामुळे पालकही मोठ्या उमेदीने आपल्या पाल्याला पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून अनेक तरुण येथे येतात. मात्र याच पुण्यात या विद्यार्थ्यांचा पार्टी फिलर म्हणून वापर करण्यात येत आहे. अनेकदा तरुणाई मित्रांच्या संगतीने हुक्का पार्लर, पब कल्चरचे बळी ठरतात. सध्या कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. पबमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. कपल एन्ट्री, फ्रि ड्रिंक शिवाय गर्ल्स नाईट यांसारख्या सवलतींना तरुणाई भाळते. यामुळे ही पाश्चात्य संस्कृती शहरांमध्ये बोकाळताना दिसत आहे.
कारवाई झालेली हॉटेल पुढीलप्रमाणे : प्लंज, कोरेगाव पार्क, लोकल गॅस्ट्रो बार, एलरो, युनिकॉर्न, आर्यन बार, बालेवाडी, नारंग वेंचर, हॉटेल मेट्रो, लेमन ग्रास, विमाननगर, बॉलर, हॉटेल काकाज