लोणी काळभोर : पुणे शहरासह जिल्ह्यात काल सोमवारी (ता.१७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली . या मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक नागरिकांच्या बैठे घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पूर्व हवेलीत ताली फुटून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहेत. पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातील फुलशेती, ऊस, कोथिंबीर, पालक हे पिके भुईसपाट झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील प्रतिक काळभोर म्हणाले कि, दोन दिवस पडलेल्या प्रचंड पावसामुळे पाटील वस्ती येथे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हि पूरस्थिती ओढयातील अतिक्रमणामुळे झाली आहे. तरी, संबंधित अधिकाऱ्यांनी नकाशाप्रमाणे ओढा करावा. व अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करून अतिक्रमण हटवावे. अशी मागणी प्रतिक काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान, पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडी व घरांच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाड व भिंती पडल्यामुळे काही नागरिक जखमी झाले आहेत. तर मंगळवार पेठ स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब ५ जण पाण्यात अडकले होते. तर कोंढवा खुर्द येथील भाजी मंडई लगत असलेल्या एका ठिकाणी ७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना यश आले आहे.