पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक वादातून एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. महेश मोटवानी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज (दि. २६) सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी राम मनवाणी हा थेट रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश आणि आरोपी राम यांच्यामध्ये आर्थिक वाद होते. यावरून त्यांच्यात अनेकदा किरकोळ वाद झाले होते. आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास महेश मोटवाणी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. शेजारीच राहणारा राम त्यांची वाट पाहात होता. अचानक रामने महेश यांच्या डोक्यात आणि खांद्यावर कुऱ्हाडी सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महेश हा गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, महेश यांना डॉक्टरांना तपासून मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, या घटनेनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन रामने थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनस्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.