दौंड (पुणे) : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी परिसरातील परप्रांतीय कामगारांच्या घरात घुसून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या ५ पैकी एका आरोपीला दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील आणखी चार आरोपी फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
अजय प्रकाश राठोड (रा. गिरीम, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ६) कुरकुंभ ‘एमआयडीसी’मध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर राहत्या घरी झोपले असताना पाच व्यक्तींनी येऊन दरवाजाला धडक देऊन घरात प्रवेश केला. घरातून दोन मोबाईल, सहा हजार रुपये रोकड व पाकिटे असा ५६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत आशिष रमेश प्रजापती यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या घटनेचा पोलीस तपास करीत असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरची चोरी ही अजय राठोड याने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला गिरिम गावच्या हद्दीतून ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. ही कारवाई दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस हवालदार अमोल देवकाते आदींनी केली आहे.