बारामती, (पुणे) : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 21 वर्षीय विवाहित तरुणी नंदिनी शुभम पवार हिने मंगळवारी (ता. 28 मे) आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिच्या पतीने तिची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच चारहि आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पाषाण येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर 100 पेक्षा जास्त नातेवाईकांनी व भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्या वतीने आंदोलन करून हि मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिगवण रोड, बारामती येथे 28 मे रोजी एका 21 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पती शुभम अशोक पवार, सासू लिलाबाई अशोक पवार, सासरे अशोक श्रीपती पवार, दीर अक्षय अशोक पवार सर्व (रा. बारामती ता. बारामती) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी बारामती पोलिसांनी आरोपी शुभम याला अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार झाले आहेत. 15 दिवस होऊनहि आरोपी मोकाट फिरत असून अजूनही उर्वरित आरोपींना अटक केली नाही. तसेच त्यांचा शोध लागला नसल्याने नातेवाईकांनी पुण्यातील पाषाण भागात असलेल्या जिल्हा पोलीस अशीक्षक कार्यालयाच्या बाहेर 100 व त्यापेक्षा जास्त नातेवाईकांनी आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मृत व्यक्ती नंदिनी पवार हिने आत्महत्या केली नसून आरोपींनी तिचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी, तसेच तपासी अधिकारी बदलावा, अशा मागण्या केल्या आहेत. सदर मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना देण्यात आले आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आंदोलनकर्ते व नातेवाईकांना पोहोच देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, ‘पुढील 3 ते 4 दिवसात आरोपींना पकडण्यात येईल. यासाठी दोन पथके तयार करण्यात येईल. याबाबत बारामती शहर पोलिसांना सूचना दिल्या असून या प्रकरणाचा तपास वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेकडे गांभीर्याने घेतले आहे.