पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून थंडी गायब झाली आहे. उकाड्यात वाढ झाली आहे. सकाळी थंडी, दुपारी उन आणि रात्री थंड वारे असे हवामान राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात २४ तारखेनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे व परिसरात पुढील २४ तास आकाश वेळोवेळी ढगाळ राहील. तर, त्यानंतर दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात साधारण तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. त्याच काळात कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीनंतर ढगाळ वातावरणात वेळोवेळी वाढ होण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीनंतर किमान तापमानात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव, अकोला, वर्धा यासारख्या जिल्ह्यांत तापमानाचा पारा ३५ डिग्री सेल्सिअसवर गेला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यात पुढील तीन दिवसात रविवारपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर २४ फेब्रुवारीनंतर मराठवाडा व विदर्भात अति हलक्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात २१ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत साधारण तीन डिग्रीने घट होईल. तसेच, याच काळात कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे.