लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे रात्रीच्या वेळी अवैध गौणखनिज उत्खनन सुरू असून त्या गौणखनिजाची वाहतूक करुन विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याबाबतचे पुरावे पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले आहेत. याबाबत शेतकऱ्याने हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करुन न्याय मागितला आहे.
लोणी काळभोर येथील गट नंबर ११६० मध्ये रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खनन झालेले आहे. याकामी जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने उत्खनन केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हा अवैध प्रकार याच गटातील दुसऱ्या शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने प्रथम लोणी काळभोरच्या तलाठी यांना कळवले. मात्र बघते व पहाते या उत्तराशिवाय पुढे काहीच कारवाईची हालचाल न झाल्याने संबंधित शेतकऱ्याने हवेलीचे तहसीलदार व लोणी काळभोर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.
अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक याविषयी तक्रार देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने अधिकाऱ्यांभोवती संशयाची सुई फिरत आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाने प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी गौणखनिज उत्खनन व वाहतूक झाल्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, प्रशासनातील काही अधिकारी ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप ‘ अशी भूमिका घेत असल्याने शासनाला रॉयल्टी मिळत नाही. तसेच काही अधिकाऱ्यांना चिरीमिरीत प्रोटोकॉल मिळत असल्याने गौणखनिज माफिया शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहे. यामुळे काही ठिकाणी तलाठी व सर्कल यांच्या कारभाराविषयी नागरिक शंका घेऊ लागले आहेत.
लोणी काळभोर येथील गौणखनिज उत्खननाबाबत शेतकऱ्याचा अर्ज आलेला आहे. यासाठी मंडलाधिकारी यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यासाठी सांगितले आहे. मंडलाधिकाऱ्यांकडून गौणखनिज उत्खननाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
स्वाती नरुटे (निवासी नायब तहसीलदार, हवेली)