न्हावरे,ता.28: शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शासनाच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा साठा केल्याप्रकरणी दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 8 लाख 78 हजार रुपयांचा अमोनियम सल्फेट व मॅग्नेशियम सल्फेट खतसाठा जप्त केला आहे.

या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील (वय 53, रा.सिंहगड रोड,पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून, आरोपींची नावे संतोष दिनकर वेताळ आणि महेंद्र गणपत शेलार (दोघेही रा.न्हावरे,ता.शिरूर, जि.पुणे) अशी आहेत.

ही कारवाई मंगळवारी (ता.27) सायंकाळी न्हावरे गावाच्या हद्दीत गट नंबर 313 मध्ये करण्यात आली. या ठिकाणी विना परवाना 917 बॅगा अमोनियम सल्फेट (40 किलो प्रती बॅग) आणि 11 बॅगा मॅग्नेशियम सल्फेट (25 किलो प्रती बॅग) असा मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा साठा आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित आरोपींकडे कोणताही कायदेशीर परवाना नसताना त्यांनी शासनाची फसवणूक करून रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा केला होता. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे रासायनिक खते नियंत्रण आदेश तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.







