पुणे : राज्यात नाही तर देशात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. रोज नव्याने पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे समोर येत आहे. पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रे सापडली असल्याची माहिती समोर आली आहे.
आज (सोमवारी) सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक पार पडणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी फोनवरून दिली आहे.
पूजा खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. पूजा खेडकर संबधित सर्व कागदपत्रे आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर केली जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली आहे.
पूजा खेडकरला डोळे आणि मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तत्कालीन वैद्यकीय मंडळांना हे प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले आहेत.
पूजा खेडकरने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केले असल्याची माहिती समोर आली. पूजा खेडकर यांनी 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी अॅडमिशन घेतले होते. यावेळी NT – 3 म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून अॅडमिशन घेतले होते. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल तरच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देण्यात येतं. मात्र त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन क्रिमीलेअरचा वापर केल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावे लागते. पूजा खेडकर यांनी काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना फिटनेस सर्टिफिकेट सादर केले होते. त्यामध्ये त्यांनी कुठल्याच स्वरूपात दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी मात्र त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.