पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे, असंही सरकारने म्हटलं आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत कारवाई केली आहे.
दरम्यान, यूपीएससीकडून यापूर्वीच पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी यूपीएससीकडून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. तसेच त्यांना यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट केलं होतं. याशिवाय पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही यूपीएससीकडून देण्यात आले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी 2020-21 मध्ये ओबीसी कोट्यात ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने परीक्षा दिली होती. यानंतर परीक्षा देण्याची मर्यादा संपलेली असताना देखील पूजा खेडकर यांनी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी (दिव्यांग) कोट्याअंतर्गत परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांनी ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ हे नाव वापरून परीक्षा पास करत 821 क्रमांक मिळवला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांची उमेदवारी रद्द केली. यानंतर पूजा खेडकर यांनी आपली उमेदवारी रद्द करण्याच्या यूपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी त्यांचे नाव, पालकांचे नाव, त्यांचे फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून आपली खोटी ओळख निर्माण करत परीक्षेला बसल्या. अश्तच आता यूपीएससी नंतर केंद्र सरकारनेही त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.