पुणे : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिममध्ये बदली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पूजा खेडकरविरुद्ध प्रशासनाकडे अनेक तक्रारीही आल्या होत्या. सध्या खेडकर या त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत आहेत. यातच आता त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होताना डोळ्यांची दृष्टी कमी असल्याचा दावा केला होता. हा दावा वादात अडकण्याची शक्यता दिसून येत आहे.
पूजा खेडकर यांनी चमकोगिरी केल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणे, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी वारंवर केली. तसेच परिविक्षाधीन (प्रोबेशनरी) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा केली. ज्यानंतर त्यांची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे. आता पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. युपीएससी परीक्षा देत असताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते.
युपीएससी परीक्षेत सूट मिळावी यासाठी पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचे जाणूनबुजून सांगितले का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. परीक्षेत कमी मार्क मिळूनही दिव्यांग असल्यामुळे सूट मिळाल्यानंतर पूजा खेडकर परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि त्यांचा देशभरातून 841 वा क्रमांक लागला. युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध होण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.
22 एप्रिल 2022 रोजी त्यांना पहिल्यांदा दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले गेले. मात्र त्यावेळी कोरोना झाल्याचे कारण देऊन त्यांनी वैद्यकीय तपासणी टाळली. त्यानंतर 26 आणि 27 मे 2022 रोजी एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले. त्यावेळीही खेडकर अनुपस्थित राहिल्या. त्यानंतर 1 जुलै, 26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वैद्यकीय तपासणीला त्यांनी दांडी मारली होती.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नेमून दिलेल्या रुग्णालयात तपासणी न करता पूजा खेडकर या दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला होता. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले. 23 फेब्रुवारी 2023 रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल देण्यात आला. मात्र काही वेळानंतर त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती झाली.
शारीरिक अडचणींबरोबरच पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयरबाबत केलेला दावाही खोटा असल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरताना 40 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. दिलीप खेडकर यांची संपत्ती पाहता पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रावर पश्नचिन्ह उभे राहतात.