पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील एकांतपणाचे काढलेले व्हिडिओ जावयाने आपल्या सासुला पाठवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. एवढंच नाही तर आपल्या पत्नीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २४ आणि २५ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी २२ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध (वय-२६) आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर पतीबरोबर काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पतीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरुन मारहाण करुन वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. भांडणे करुन त्यांच्या मुळ गावी निघून गेला. त्यानंतर त्याने फिर्यादी व त्यांच्या दोघांचे फोटो व व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन फिर्यादीची बदनामी केली.
तसेच फिर्यादी व त्यांचे व्हिडिओ फिर्यादीच्या आईच्या व्हॉटसअपवर पाठवून त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.